डोंबिवली – कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल भागात २२ हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आझमगड येथून एका वीटभट्टीवरून अटक केली. ही कारवाई करताना पोलीस तेथे मजुराचा पेहराव करून कष्टकरी म्हणून राबत होते.राजेश अरविंद राजभर (३२, रा. प्रभूदर्शन चाळ, जावसई, अंबरनाथ, डोंबिवलीतील कुंभारखाण पाडा भागातील शांताबाई निवास) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. रामनगर, मानपाडा, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, कोळसेवाडी, विष्णूनगर, महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत त्याने घरफोड्या केल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २२ लाखाचा ऐवज, ३४३ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
डोंबिवलीतील देसलेपाडा भागातील विलास भाटकर रक्षाबंधनानिमित्त कुटुंंबासह नातेवाईकांकडे गेले होते. त्या दिवशी दुपारच्या वेळेत चोरट्याने त्यांच्या बंंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून लाखो रूपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात भाटकर यांनी तक्रार केली होती.भाटकर यांच्या घर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासल्यानंतर ही चोरी राजेश राजभर या चोरटयाने केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस त्याच्या मागावर होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध डोंबिवली कुंभारखाणपाडा, अंबरनाथ येथे घेतला. तो आढळून आला नाही.
हेही वाचा >>>डोंबिवली: भागशाळा मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉलला नागरिकांचा विरोध, पालिका आयुक्तांना सामाजिक कार्यकर्त्याचे पत्र
तो उत्तरप्रदेशातील त्याच्या आझमगड जिल्ह्यातील देवगड गावी पळून गेला आहे. तेथे तो लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाचे एक पथक देवगाव भागात पोहचले. तेथे काही दिवस मुक्काम ठोकून त्यांनी राजेशची माहिती काढली. ग्रामस्थांनी तो एका वीट्टभट्टीवर मजूर म्हणून काम करत आहे अशी माहिती दिली.तपास पथकातील पोलिसांनी विटभट्टी मजुराचा पेहराव करून देवगाव भागातील विटभट्टीवर सापळा लावला. ठरल्या वेळेत राजेश एका दुचाकीवरून विटभट्टीच्या दिशेने कामासाठी येत होता. मजुराच्या वेशातील एका पोलिसाने राजेशला थांबून एके ठिकाणचा पत्ता विचारला. दुचाकीवरील इसम राजेश असल्याची खात्री पटल्यावर सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी राजेश राजभरवर झडप घालून त्याला अटक केली.
मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सुनील तारमळे, अविनाश वणवे, प्रशांत आंधळे, राजेंद्र खिलारे, सुनील पवार, नाना चव्हाण यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.