उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीनही शहरांच्या परिमंडळ चारमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना ६२ गुन्ह्यांची उकल केली असून यात ३१ लाख ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे. हा सर्व मुद्देमाल नुकताच पोलिसांनी तक्रारदारांना परत केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या एका प्रसिद्ध डॉक्टरांच्या घरी रात्री दरोडा टाकत दरोडेखोरांनी तब्बल एक कोटींची लूट केली होती. त्यानंतर दोन हत्यांच्या घटनांनी अंबरनाथ शहर हादरले होते. त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अंबरनाथच्या एका हत्येचे आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाहीत. तर कोटीची लूट करणारे दरोडेखोरही अजून सापडलेले नाहीत. असे असताना परिमंडळ चारच्या पोलिसांनी एक समाधानकारक कामगिरी केली आहे. परिमंडळ चारमध्ये उल्हासनगर शहरातील चार, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील प्रत्येकी दोन असे आठ पोलीस ठाणे आहेत. या आठही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या तब्बल ६२ चोरीच्या गुन्ह्यांची पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे. ही उकल करताना पोलिसांना ३१ लाख ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक २० गुन्ह्यांचा समावेश आहे. या २० गुन्ह्यात ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ज्या साऊंड ऑफ म्युझीक या मोबाईलच्या दुकानात मोठी चोरी झाली होती. त्या चोरीतील मुद्देमालाचाही समावेश होता. या दुकानातून १८ लाखांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. त्या मंगळवारी उल्हासनगर कॅम्प तीन भागातील शहीद अरूणकुमार वैद्य सभागृहात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड आणि जगदीश सातव यांच्या उपस्थितीत ज्यांच्याकडे चोरी झाली त्यांना मुद्देमाल परत करण्यात आला. विविध पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Story img Loader