कल्याण – तुला बक्कळ पैसा, आरामदायी जीवन हवे असेल. तुझा भाग्योदय व्हावा असे वाटत असेल तर तु आमच्या सोबत चल. एक ज्योतिष पाहणारा बाबा आहे. तो तुझे ज्योतिष पाहून चांगले सल्ले देईल. आणि तुझ्या जीवनाचा कायापालट होईल, असे तीन जणांनी कल्याण पूर्वेतील एका केबल व्यावसायिकाला सांगितले. या व्यावसायिकाला मलंंगगड रोड भागात एका इमारतीत नेऊन त्याला तेथे बांधून तीन जणांनी त्याच्या जवळील ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

२७ हजार रुपये रोख रक्कम, तीन महागडे मोबाईल या वस्तूंचा लुटीमध्ये समावेश आहे. विजय रामचंद्र गायकवाड (५६) असे केबल व्यावसायिकाचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील गायत्री शाळा परिसरातील शिवराम पाटीलवाडी भागात राहतात. गिरीश रमेश खैरे (५०, रा. शिवराम पाटीलवाडी, कल्याण पूर्व), विनायक किसन कराडे, विनयकुमार कृष्ण यादव उर्फ राघव अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन या कालावधीत कल्याण पूर्वेतील मलंग रोड भागातील काका ढाबा परिसरातील सखुबाई पाटील नगर भागातील चेतन पार्क या इमारतीमधील एका सदनिकेत हा प्रकार घडला.

हेही वाचा – कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे

मानपाडा पोलिसांनी सांगितले, आरोपी विनायक, विनयकुमार आणि गिरीश यांनी तक्रारदार केबल व्यावसायिक विजय गायकवाड यांना ओळखतात. आरोपींनी विजयला मलंगगड रस्त्यावरील चेतन पार्कमध्ये एक ज्योतिषी आहे. तो चांगल्या प्रकारे भविष्य सांगतो. त्यामुळे भाग्योदय होतो. या तिन्ही आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आपले भविष्य उज्जवल करून घेऊ, या विचारातून विजय गायकवाड हे तिन्ही आरोपींच्या सोबत मंगळवारी सकाळी काका ढाबा परिसरातील सखुबाई नगर भागातील चेतन पार्कमध्ये गेले. तेथे एका सदनिकेत विजय गायकवाड यांना नेण्यात आले. सदनिकेत गेल्यानंतर तेथे कोणीही नव्हते. ज्योतिषी कुठे आहे, असा प्रश्न विजय गायकवाड यांनी केला. आरोपींनी तो थोड्याच वेळात येईल, असे सांगून खोलीचा दरवाजा बंद करून विजयला तीन जणांनी घट्ट पकडले. त्याचे हात, पाय दोरीने बांधून त्यांना जखडून ठेवण्यात आले. या प्रकाराने विजय गायकवाड घाबरला. आपली सुटका करण्याची मागणी तो करू लागला. तेथे त्याच्या बचावासाठी कोणीही नव्हते. विजयने ओरडा केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जखडून ठेवलेल्या विजयला आरोपींनी तुझ्या जवळील आहे ती रक्कम आणि ऐवज आम्हाला दे, नाहीतर जवळील टणक वस्तूने आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी दिली.

हेही वाचा – शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात

अचानक घडलेल्या या प्रकाराने विजय हतबल झाला होता. तिन्ही आरोपींनी विजयच्या खिशातील २७ हजार रुपये रोख, त्याच्या जवळील तीन मोबाईल काढून घेतले. हा प्रकार कोणालाही न सांगण्याची तंबी दिली. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर विजय गायकवाड यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. आरोपींविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एस. फडोळ तपास करत आहेत.