ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात एका भरधाव कारच्या धडकेत रिक्षा चालक अभिमन्यू प्रजापती (३२) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
हेही वाचा… ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टींवरील स्थलांतरित मजुरांची मुले शैक्षणिक सुविधांपासून वंचित
हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रंगतेय अनोख्या स्पर्धेची चर्चा
कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अभिमन्यू प्रजापती हे प्रवाशाच्या प्रतिक्षेत रिक्षामध्ये बसले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे मित्र वकील अन्सारी हे देखील होते. दरम्यान, एका भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत अभिमन्यू आणि वकील हे दोघेही जखमी झाले. त्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अभिमन्यू आणि वकील यांना रुग्णालयात दाखल केले असता, अभिमन्यू यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वकील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.