राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदाधिकारी सौरभ वर्तक याच्याविरोधात अडीच लाख रूपयांच्या फसवणूकी प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. सौरभ विरोधात यापूर्वीही फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
फसवणूक झालेले तक्रारदार हे ठाण्यात राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांची ओळख २०१८ मध्ये सौरभ वर्तक याच्याशी ठाणे महापालिकेत झाली होती. महापालिकेत माझी ओळख असून ठाण्यातील धर्मवीर नगर येथे १२ लाख रुपयांत बीएसयूपी योजनेतील घर मिळवून देतो असे त्याने तक्रारदार यांना सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांना सुरूवातीच्या काळात टप्प्याटप्प्याने अडीच लाख रुपये दिले होते. परंतु त्यानंतर सौरभने तक्रारदारांशी संपर्क साधणे बंद केले. काही महिन्यांपूर्वी तक्रारदार यांनी त्यांचे पैसे सौरभकडून परत मागितले असता, त्याने पैसे दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.