डोंबिवली – डोंबिवली एमआयडीत किटकनाशक तयार करणाऱ्या इंडो अमायन्स कंपनीत बुधवारी स्फोट होऊन आग लागली होती. नागरी जीवितास धोका तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या निष्काळजीपणाला कंंपनी प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

कंंपनीत उत्पादन प्रक्रिया करताना सुरक्षे विषयी खबरदारी न बाळगणे, निष्काळजीपणे आणि हयगयीने वर्तन करून नागरी जीवितास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि धोका निर्माण करणे, असा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार जयवंतराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमध्ये १२ जून रोजी सकाळी इंडो अमायन्स कंपनीत स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनीच्या मालमत्तेचे तसेच, जवळच असलेल्या मालदे कॅपिसीटर्सचे कंपनीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>>बाजारात रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी; छत्र्या – रेनकोटच्या दरात वाढ

पोलिसांनी सांगितले, स्फोट झाल्याच्या दिवशी इंडो अमायन्स कंपनीत टु मिथाईल सायक्लोएक्झिल ॲसिटेट, बेलोरे नायट्रेट या रसायनांवर निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, कंंपनीत स्फोट झाला. या स्फोटात इंडो अमायन्स कंपनीसह शेजारील मालदे कॅपिसीटर्स कंंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या उत्पादन प्रक्रिया करताना कंपनी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही खबरदाऱ्या घेतल्या नाहीत. अतिशय निष्काळजीपणे ही उत्पादन प्रक्रिया राबवली. तसेच, कंपनीतील कामगार, परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली. या स्फोटात कंपनी परिसरातील रस्त्यावरील वाहने, झाडे जळून खाक झाली.

हेही वाचा >>>फिरत्या शाळेमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली; ४५० मुलांचा यंदा शैक्षणिक प्रवेश

इंडो अमायन्स कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडला असल्याचा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी सुरू केला आहे.