शहापूर : येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वर्षश्राद्धाचे अन्नपदार्थ दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या पदार्थाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. १०९ विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या अधीक्षकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्रमशाळेतील अधीक्षक एन. डी. अंभोरे, प्राथमिकचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती सारीका गायकवाड, माध्यमिकचे मुख्याध्यापक जीवनराव देशमुख आणि बाहेरील जेवण पुरवणारे वासिंद येथील पंढरी चव्हाण यांच्या विरोधात वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा >>>सोलापुरात चार महिन्यात कांद्यातून ७३८ कोटींची उलाढाल; दर घसरणीमुळे ३०० कोटींचा फटका
तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी बाहेरून आलेले वर्षश्राध्दाचे पुलाव व गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ होऊन उलट्या व चक्कर येणे असा त्रास होवु लागला होता. त्यांना शहापुर येथे उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलास पवार यांनी सांगितले.
आश्रमशाळेतील मध्यान्ह भोजनाऐवजी बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या अन्नपदार्थामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर हानी पोहचण्याची शक्यता असतानाही वासिंद येथील पंढरी चव्हाण यांनी बाहेरील भोजन आणले. त्यामुळे बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या आश्रमशाळेतील अधीक्षक एन. डी. अंभोरे, प्राथमिकचे प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सारीका गायकवाड आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक जीवनराव देशमुख आणि बाहेरील जेवण पुरवणारे पंढरी चव्हाण यांच्या विरोधात वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव यांनी याप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा >>>“ओबीसीतून आरक्षण मागता आणि मागासवर्गीयांची लायकी…”, छगन भुजबळांची खरमरीत पोस्ट
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर सोडण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी पुन्हा चक्कर व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी करीत पालकांनी आश्रमशाळेतच ठिय्या मांडला होता. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी ठिय्या उठवला. खबरदारी म्हणून आश्रमशाळेत डॉक्टरांचे पथक, दोन रुग्णवाहिका व पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी सांगितले.