डोंबिवली – जलवाहिन्यांवरील पाणी चोरी आणि टँकर माफियांमुळे २७ गाव हद्दीत पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याने मंगळवारपासून कल्याण डोंबिवली पालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पाणी चोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांतील लोढा रिजन्सीच्या बाजुला संदप रस्त्यावर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी चोरी केली जात आहे, अशी माहिती ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांना मिळाली. पवार यांनी मंगळवारी पहाटे ई प्रभागातील तोडकाम पथक सोबत घेऊन संदप रोडवरील मुख्य जलवाहिनीची पाहणी केली. त्यांना तेथे जलवाहिनीला छिद्र पाडून त्यामधून पाणी चोरून वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. हेमंत नकुल पाटील या पाणी चोराने हा प्रकार केला आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पवार यांना मिळाली.

हेही वाचा – डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

हेही वाचा – ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार

मुख्य जलवाहिनीवरून पाणी चोरून वापरून गाव हद्दीत पाणी टंचाईस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि जलवाहिनीची तोडमोड केल्याप्रकरणी साहाय्यक आयुक्त पवार यांनी संदप गावातील हेमंत नकुल पाटील याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against the water thief in sandap ssb