कल्याण – दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे दृश्यध्वनी चित्रफितीमधून वक्तव्य करणाऱ्या, तसेच, एका धर्माचा अपमान होईल अशा पद्धतीने ध्वनीचित्रफित बनवून समाजमाध्यमांत सामायिक करणाऱ्या डोंबिवलीजवळील निळजे लोढा हेवनमधील एक रहिवासी आणि एका कोळेगावातील व्यक्तीविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

योगेश कमलेश्वर पांडे असे गुन्हा दाखल व्यक्तीचे नाव आहे. ते निळजे लोढा हेवन येथे कुटुंबीयांसह राहतात. एका धर्माला उद्देशून त्या धर्माचा अपमान होईल अशा पद्धतीने योगेश यांनी दोन ध्वनीचित्रफिती तयार केल्या. त्या समाजमाध्यमांमध्ये सामायिक केल्या. या ध्वनीचित्रफितीमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबद्दल मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रीतम काळे यांनी भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट

दुसऱ्या एका प्रकरणात डोंंबिवलीजवळील कोळेगाव येथील रहिवासी प्रेमनाथ यशवंत पाटील (४३) यांनी सोमवारी रात्री येथील साहिल केशकर्तनालयात उपस्थित लोकांच्यामध्ये एका धर्माच्या तरुणासमोर या गावात कधीही पाऊल ठेवायचे नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांनी गावात राहायचे नाही. त्यांनी येथून निघून जायचे आहे. गावकऱ्यांनी त्यांना निवासासाठी राहण्यास जागा देऊ नयेत. संबंधित स्वत:हून गाव सोडून निघून न गेल्यास मारहाण करून बाहेर काढण्याचे वक्तव्य प्रेमनाथ पाटील यांनी दृश्यध्वनीचित्रफितीमध्ये केले आहे. समाजमाध्यमांतील ही दृश्यध्वनीचित्रफिती मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या चित्रफितीची शहानिशा करून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल प्रेमनाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक आरळेकर तपास करत आहेत.

हेही वाचा – बकरी पालन व्यवसायासाठी माहेरहून २० लाख आणले नाही म्हणून डोंबिवलीत विवाहितेचा छळ

समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य, दृश्यध्वनीचित्रफित नागरिकांनी समाजमाध्यमांंमध्ये प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.