ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्याविरोधातही नौपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वागळे इस्टेट एका बांधकामाविषयी संजय घाडीगावकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेनंतर शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे समन्वयक एकनाथ भोईर, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख शैलेश कदम आणि माजी परिवहन सदस्य दशरथ यादव यांनी गुरूवारी रात्री उशिरा संजय घाडीगावकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे, दोन गटात तेढ निर्माण केल्याप्रकरणी घाडीगावकर यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे समर्थक आणि मुंबईतील माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्याविरोधातही नौपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनाही ठाणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ मे पर्यंत प्रवेश करण्यास त्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.