डोंबिवली – डोंबिवली पूर्व भाजपा मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर येथील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने बुधवारी विनयभंगाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. भाजपा कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याने डोंबिवली भाजपातर्फे गुरुवारी सकाळी अकरा वाजता मानपाडा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, असे भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
नंदू जोशी यांनी आपली सदनिका आपणास खाली करण्यास भाग पाडले आणि आपल्याकडे शारीरिक सुखाची वारंवार मागणी केली, अशी तक्रार पीडितने पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस अधिकारी असलेला पती आणि पीडित पत्नी यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या प्रकरणात जोशी हस्तक्षेप करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे. जोशी यांच्यावर पोलिसांनी भादंवि संहितेच्या ३५४ अ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – ठाणे: धरणातील गाळातून शिवारांना सुपीकता
डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी आपल्यावरील दाखल गुन्ह्यातील आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित महिलेशी मागील १० वर्षांत आपण कधी संवाद साधला नाही. मोबाईलवर संभाषण केले नाही. आपण फक्त या महिलेच्या पोलीस अधिकारी असलेल्या पतीला मित्र म्हणून विविध प्रकरणात सहकार्य करतो. जोशी यांच्यामुळे पती आपणास त्रास देतो, असा गैरसमज या तक्रारदार महिलेचा झाला. म्हणून आपल्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कायद्याने जी कारवाई करायची आहे ती करावी. आपण अटकपूर्व जामीन घेणार नाही, असे जोशी यांनी सांगितले.
जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपाच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून भाजपा आणि जोशी यांची बदनामी करण्याचा हा डाव आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण तयार करण्यात आले आहे, असे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. मानपाडा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेसंदर्भात कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. जोशी यांना तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.