ठाणे : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मांसाहारी असल्याचे विधान आव्हाड यांनी केले होते. भाजप उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शिर्डी येथे नुकतेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले होते. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात उपस्थित केला. त्यावर राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत.
हेही वाचा… विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थाना बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. भाजपच्या उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी राम हा मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे विधान प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान करणारे आहे. हे वक्तव्य माझे आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले असून या विधानावर आक्षेप असल्याचे सेजल यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.