भिवंडी येथील अक्सा उपाहारगृह परिसरात भररस्त्यात नागरिकांमागे सुरा घेऊन धावणाऱ्या इरफानला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. इरफानला ताब्यात घेत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केली. तर, त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात येऊन आरडाओरड करत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणात दोघांविरोधातही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इरफान अन्सारी (४५) हा पत्नी परवीन (४०) हिच्यासोबत दुधबावडी परिसरात राहतो. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो भररस्त्यात येऊन नागरिकांना सुरा दाखवून ‘मैं यहाँ का दादा हूँ, किसी को नही छोडूँगा’ अशी धमकी देऊ लागला. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांची पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एस. गायकर, हवालदार दराडे, पोलीस नाईक नागरे आणि पोलीस शिपाई किशोर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. किशोर पाटील यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, इरफानने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यात शर्टच्या नावाची पाटीही तुटली. त्यानंतर पथकाने इरफानला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.

त्याच्याविरोधात कारवाई सुरू असतानाच त्याची पत्नीही पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला असता तिनेही या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या घटनेप्रकरणी इरफान आणि त्याची पत्नी परवीन हिच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इरफानला अटक केली आहे.

Story img Loader