डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने आपल्या वरिष्ठांच्या नावे ५० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागून तडजोडीने ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने गुरुवारी या पोलिसा विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> ठाणे : सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या “सेंट जॉन लर्निंग ॲप” चे उद्घाटन
मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नितीन भिका राठोड (बक्कल क्रमांक ४४५५) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलिसा विरुध्द नेमणुकीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी सांगितले, मानपाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या एका तक्रारदार इसमा विरुध्द एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात या प्रकरणाचा तपास करणारे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांनी आरोपीला मदत केली. आणि यापुढे देखील अशीच मदत ते करणार आहेत. त्यामुळे या सहकार्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी तपासी अंमलदाराने केली असे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाळत ठेऊन, ध्वनीमुद्रण करुन तीन महिने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांना उपनिरीक्षक मुसळे कोठेही लाचेची मागणी करत आहेत असे ध्वनीमुद्रण किंवा पडताळणीत आढळून आले नाही. परंतु, उपनिरीक्षक मुसळे यांचे लेखनिक पोलीस नाईक नितीन राठोड हे तक्रारदार समीर भोईर यांच्याशी ५० हजार रुपयांच्या लाचे ऐवजी ४० हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवित असल्याचे पडताळणीत उघड झाले. लाचेची मागणी राठोड यांच्याकडून करण्यात आल्याचे पडताळणीत उघड झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांनी पोलीस नाईक नितीन राठोड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही लाच नितीन कोणासाठी मागत होता हे तपासात स्पष्ट होणार आहे.
कोणीही सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी लाच मागत असेल तर नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांनी केले आहे.