गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी सुरू असताना अगरबत्ती आणि पुजा साहित्य विक्रीच्या दुकानातून तब्बल दोन लाखांची रोकड आणि ४५हजारांची सोनसाखळी एकाएकी गायब झाली. त्याचवेळी दुकानात पूर्वी काम करणाऱ्या एका कामगाराने नवी दुचाकी आणि चक्क महागडा एप्पल कंपनीचा आयफोन विकत घेतला. त्यामुळे ही रोकड या दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच चोरल्याचा संशय व्यक्त करत दुकानदाराने कामगाराविरूद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ठाणे : एमएमआरडीएच्या उपनियोजक अधिकाऱ्याला २४ हजारांची लाच घेताना अटक
सुनील चंद्रकांत महाडीक यांचे अंबरनाथ पश्चिमेत ओम श्री साईराम नावाचे अगरबत्ती व पुजेचे साहित्य विक्रेचे दुकान आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकान सज्ज होते. नारळ पुरवठा तसेच अगरबती पुरवठादारांचे थकीत बिल दयायचे असल्याने सुनील महाडीक यांनी दुकानात रोख ठेवले होते. नारळ आणि अगरबत्ती पुरवठादार बिल घेण्यासाठी आलेच नाहीत. म्हणुन महाडीक यांनी रक्कम दुकानात ठेवली. २४ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास महाडीक घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी फिर्यादी दुकानात आले असता दुकानाच्या मागच्या बाजूच्या लोखंडी जाळ्या कापलेल्या दिसल्या. त्यावेळी दुकानात ठेवलेली रक्कम मोजली असता त्यात फक्त ५० हजार असल्याचे दिसून आले. महाडीक यांचे वडील रूग्णालयात असल्याने ते तात्काळ तक्रार देण्यासाठी गेले नाहीत. त्यानंतर त्यांना त्यांच्या दुकानात यापूर्वी असलेल्या राज सुरेश आंबवले याने त्याच्या व्हाट्सअप स्टेट्सवर नवीन दुचाकी आणि आयफोन घेतल्याचे फोटो टाकल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दुकानातील चावी कुठे ठेवतात याची माहिती असलेल्या राज आंबवले याने रक्कम आणि सोनसाखळी याने घरफोडी चोरी केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी राज आंबवले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.