कल्याण पूर्व भागातील आय प्रभाग हद्दीत एकही बेकायदा चाळ, प्रदुषणकारी जीन्सचा कारखाना उभा राहणार नाही यासाठी विशेष नियोजन आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केले आहे. या कारवाईचा भाग म्हणून बेकायदा चाळी उभारणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे. दोन दिवसापूर्वी वसार भागातील चार जणांवर बेकायदा बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर माणेरे येथील एका चाळीचे बांधकाम करणाऱ्या बांधकामधारका विरुध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वेतील आय प्रभाग हद्दीतील माणेरे गाव परिसरात विनोद फुलोरे आणि इतरांनी सर्व्हे क्रमांक ५७ हिस्सा क्रमांक २ वर बेकायदा चाळींचे बांधकाम करत असल्याच्या तक्रारी साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याकडे आल्या होत्या. साहाय्यक आयुक्त पवार, अधीक्षक शंकर जाधव यांनी माणेरे येथे जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. तेथे चाळींचे बांधकाम सुरू असल्याचे आणि हे बांधकाम विनोद फुलोरे करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. साहाय्यक आयुक्त पवार यांनी चाळ बांधकामधारक विनोद फुलोरे यांना बांधकाम परवानगी, जमिनीची कागदपत्रे दाखल करण्याची नोटीस, तसेच ही कागदपत्रे सादर केली नाही तर ते बांधकाम अनधिकृत घोषित करून स्वताहून काढुन टाकण्याचे कळविले होते.

दिलेल्या मुदतीत विनोद फुलोरे यांनी चाळ बांधकामाची कोणतीही कागदपत्रे पालिकेच्या आय प्रभागात दाखल केली नाहीत. त्यामुळे सदरचे बांधकाम साहाय्यक आयुक्त पवार यांनी अनधिकृत घोषित केले. अधीक्षक शंकर जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाने व महाराष्ट्र महापालिका अधिनियमाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विनोद फुलोरे यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला.

दोन दिवसापूर्वी आय प्रभाग अधिकाऱ्यांनी वसार डावलपाडा येथे बेकायदा चाळींचे बांधकामे करणाऱ्या बाळकृष्ण फुलोरे, मंगशे फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांच्या विरुध्द हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वसार, माणेरे येथील येथील गुन्हा दाखल झालेल्या बांधकामधारकांच्या बेकायदा चाळी भुईसपाट करण्यात येणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले.

आय प्रभाग हद्दीत एकही इमारत, चाळी, व्यापारी गाळ्याचे बांधकाम उभे राहणार नाही असे नियोजन केले आहे. आता बेकायदा बांधकाम कसलेही असले तरी त्यांच्यावर पहिला एमआरटीपीचा गु्न्हा दाखल करून मग ते बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.