ठाणे : Navratri Ustav tembhinaka thane टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृतीश्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून ठाण्यातील टेंभीनाक्यावरील नवरात्रौत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आयोध्येचे श्रीराम मंदिर कसे असेल, हे प्रत्येक नागरिकांना कळावे, या उद्देशातून ही प्रतिकृती साकारण्यात येत आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून हा उत्सव सुरू केला आहे.
दिघे यांच्या निधनानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसेच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवीभक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य असते. यंदा श्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळया, ऑईल पेंट या सामुग्रीचा वापर करून तयार करण्यात येत आहे. या मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत आहेत, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >>> पंधरा वर्षे छपाई यंत्र न वापरताच भंगारात, उल्हासनगर महापालिकेचा प्रताप, नागरिकांच्या खर्चाचा चुराडा
श्रीराम मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे ३५० कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. हे कामगार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कलकत्ता येथील आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा ४० x ४० फुट इतक्या मोजमापाचा आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठुमाऊली व श्री सत्यनारायणाचे भाविकांना दर्शन होणार आहे. सभा मंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्प कलेची ओळख पटवून देणारी असेल असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे : गृहसंकुलातील गरबा प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद
संपूर्ण कारविंग असलेले ४० x ६० फुटाचे छत असून, एकूण ३२ छोटे-मोठे कोरीव खांब या मंदिराचा डोलारा उलघून धरणार आहेत. तर ६४ कोरीव कमानी एकंदरीत गाभाऱ्याची आणि सभामंडपाची आकर्षक मुर्त्यासह शोभा वाढविणार आहेत. माँ दुर्गेचे मखर पूर्णपणे सुवर्णांकीत असून, त्याची उंची १८ फुट, लांबी १४ फुट तर रुंद १० फुट आहे. मंदिराची शोभा वाढविण्यासाठी नक्षीकाम असलेल्या कार्पेट सोबतच झुंबर आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. बाहेरील बाजूस ६ फुटी उंचीचे दोन गरुड स्वागतासाठी उभे असतील तर एक मुख्य आणि सात छोटे-मोठे कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत १० फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील. बाहेरील रस्त्यावरील मुख्य कमानी वानरसेनेचे दर्शन घडविणारे असल्यामुळे आपण श्रीरामांच्या नगरीत असल्याची निश्चितच अनुभूती भाविकांनी निश्चितच होईल, असेही म्हस्के म्हणाले.