ठाणे : डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक ठाणे महापालिका घनकचरा विभागाने सोमवारी स्थानिकांना दाखविले. त्यावर आता स्थानिक प्रकल्पाबाबत काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्प २५ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु डायघर प्रकल्पास तेथील स्थानिकांनी विरोध सुरू केल्याने महापालिकेसमोर कचरा पेच निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे चित्र असतानाच, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह डायघर भागातील स्थानिकांनी काही दिवसांपुर्वी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. स्थानिकांचा प्रकल्पास विरोध नाही पण, या प्रकल्पामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी रोष आहे. भविष्यात प्रकल्प बंद पडला तर परिसरात दुर्गंधी पसरू शकते. तसेच प्रकल्प ठिकाणी मोठी वाहने येणार असून या भागात शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशा भावना नाईक यांनी व्यक्त केल्या होत्या. या चर्चेदरम्यान, डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही याचे प्रात्यक्षिक स्थानिकांना दाखविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले होते.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढला; शंभर अतिरिक्त खाटा वाढविण्याचा निर्णय

यानुसार, ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डाॅ. राणी शिंदे आणि डायघर घनकचरा प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी यांनी सोमवारी दुपारी स्थानिकांना प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखविले. डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मीती केली जाणार असून त्यासाठी येथे यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही यंत्रणेचे कामकाज कशाप्रकारे चालणार आहे आणि त्याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मीती केली जाणार आहे. उर्वरित कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाणार आहे, या सर्वाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावर आता स्थानिक प्रकल्पाबाबत काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविणार की विरोध करणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A demonstration of daighar waste project by the municipality to the locals ysh
Show comments