डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाण्यात एका चौकशी प्रकरणात येऊन तेथे पोलीस अधिकारी नाहीत हे पाहून पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून शेरो शायरी करत चित्रफित तयार केली. ती समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या ठाकुर्लीतील विकासक आणि रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी (५१) याला पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून १८ महिन्यांसाठी ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
सुरेंद्र हा ठाकुर्लीतील चोळेगावात राहतो. तो विकासक आहे. त्याच्यावर एकूण सात गुन्हे यापूर्वीच दाखल होते. मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून सुरेंद्रने पोलीस अधिकाऱ्यांचा अवमान केला होता. याप्रकरणात पोलिसांना टिकेचे लक्ष्य व्हावे लागले. याप्रकरणी सुरेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही भोंदूंनी सुरेंद्रला तुम्हाला झटपट श्रीमंत होण्यासाठी आम्ही घरात पैशाचा पाऊस पाडून दाखवितो, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ५० लाखांहून अधिकची रक्कम उकळून पलायन केले होते. पोलिसांनी भोंदूबांबाना पकडून जप्त केलेली रक्कम ताब्यात घेण्यासाठी सुरेंद्रला पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्यावेळी त्याने तेथे अधिकारी नसल्याचे पाहून पोलीस खुर्चीत बसून पोलीस अधिकारी असल्याचा आभास करत ‘राणी नही तो क्या हुआ, ये बादशहा आज भी लाखो दिलो पर राज करता है’ अशी दृश्यचित्रफीत तयार करत समाज माध्यमावर प्रसारित केली होती. या दृश्यफितीवरून वरिष्ठ पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी सुरेंद्रला तात्काळ अटक केली होती.
हेही वाचा – कल्याणच्या इराणी वस्तीमधील सोनसाखळी चोरट्यांना कारवासाची शिक्षा
त्याच्यावरील इतर गुन्ह्यांचा विचार करून त्याला तडीपार करण्यासाठीचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच मंजूर होताच त्याला मंगळवारपासून तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले, असे कुराडे यांनी सांगितले. सुरेंद्रजवळील बंदूक, पाच जिवंत काडतुसे, ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी सुरेंद्र अनेक चित्रफिती तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करत होता. त्याला ९० हजार अनुयायी होते. परवानाधारी रिव्हाॅल्वरचा तो दुरुपयोग करत होता. रामायण मालिकेत सुरेंद्रने लव-कुश जोडीत भूमिका केली होती. सुरेंद्रवरील कारवाईने पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेले राजकीय, विकासक, समाजकंटक हादरले आहेत.