उल्हास नदीने बुधवारी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे नदी काठच्या लोकांसाठी हा धोक्याचा इशारा होती, मात्र पाणी पातळीत गुरुवारी सकाळी घट पाहायला मिळाल्याने आता या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाने नोंदवलेल्या पातळीनुसार उल्हास नदी सकाळी गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास १४.९० मीटर पातळीवर वाहत होती. बुधवारी सायंकाळी पाचनंतर हीच पाणी पातळी १७.७० पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. ठाणे जिल्ह्यासोबतच शेजारच्या कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने कर्जत होऊन अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळी वर वाहत होती. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उल्हास नदीने १६.५० मीटर ही इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली होती. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बदलापूरकरांना सतर्कतेचे आदेश दिले होते. नदी किनारच्या सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. नदीकिनारी घर असलेल्यांना वरच्या मजल्यावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
बदलापूर आणि परिसरात सायंकाळनंतर पावसाचा जो कमी झाला होता. मात्र रायगड जिल्ह्यातील पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. बुधवारी सायंकाळी बदलापूरच्या सखल भागात काही ठिकाणी पाणी शिरले. उल्हास नदी पुढे कल्याण तालुक्यात वाहत जाते. येथे रायता पुलाच्या खालच्या बाजूस पाणी लागले होते. कल्याण अहमदनगर रस्त्यावर कांबा गावाजवळ रस्त्यावर पाणी आले होते. मात्र रात्री उशिरा उल्हास नदीची पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली. बुधवारी रात्री साडे नऊ वाजता उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या खाली वाहू लागली. त्यावेळी पाणी पातळ पातळी १७.३० इतकी होती. तर रात्री बाराच्या सुमारास उल्हास नदी १६.६० मीटरवर वाहत होती. गुरुवारी सकाळी केलेल्या नोंदीनुसार उल्हास नदी १४.९० मीटरवर वाहते आहे. त्यामुळे बदलापूर आणि कल्याण ग्रामीण मधील उल्हास नदी किनारी असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.