कळवा रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर २९ वर्षीय प्रवासी महिलेची सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>>ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र
कळवा येथे ही महिला राहते. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ती कळवा रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूलावरून स्वयंचलित जिन्या जवळ जात होती. त्याचवेळी एक तरुण त्याठिकाणी आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. सोनसाखळीचा अर्धा तुकडा चोरट्याच्या हातात गेला. तर अर्धा तुकडा महिलेच्या गळ्याभोवती राहिला. त्यानंतर चोरटा तो अर्धा तुकडा घेऊन पळून गेला. याप्रकारानंतर महिला घाबरली होती. मंगळवारी सायंकाळी तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.