कल्याण – कल्याण पश्चिमेतील नवीन एस. टी. बस आगारात एका बसमध्ये गर्दीतून चढत असताना एका ३३ वर्षाच्या तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी भुरट्या चोराने हिसकावून चोरून नेली आहे. गेल्या आठवड्यात सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. या चोरीप्रकरणी प्रवाशाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

स्वारगेट येथील एसटी बस आगारात एका बसमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यातील सर्व एसटी आगारातील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत कल्याण पश्चिमेतील एस. टी. बस आगाराची पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. बस स्थानकातील प्रवाशांशी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. बस आगारात प्रवासी म्हणून आलेल्या पुरूष प्रवाशांची ओळख पटवून घेतली होती.

कल्याण एस टी बस आगारात पोलिसांची गस्त, बस आगारातील सुरक्षा व्यवस्था तैनात असताना विकी कडमधाड (३३) या प्रवाशाच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी भुरट्या चोराने चोरून नेली आहे. विकी कडमधाड हे नोकरदार आहेत. ते मुंबईतील गोवंडी भागात राहतात. ते मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सावेडी गावचे रहिवासी आहेत.

विकी कडमधाड यांना बुलढाणा येथे बसने जायचे होते. ते कल्याण पश्चिमेतील नवीन एस टी बस आगारात आले. गेल्या आठवड्यात सकाळच्या वेळेत कल्याण ते बुलढाणा या बसमध्ये ते गर्दीतून चढत होते. प्रवाशांची या बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू होती. दरवाजात प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रत्येक प्रवाशाच्या हातात सामानाच्या पिशव्या आणि बसमध्ये आसन मिळण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती.

विकी हे बसमध्ये जाऊन आसनावर बसले. बसल्यानंतर त्यांनी मानेभोवती हात फिरवला. त्यांना गळ्यात सोन्याची साखळी दिसली नाही. त्यांनी तात्काळ बसमध्ये चढत असताना सोन साखळी कुठे पडली का म्हणून शोध घेतला तर त्यांना बस आगार, बसच्या पायऱ्या ते बसमध्ये चढेपर्यंतच्या मार्गात कुठेही सोन साखळी पडलेली आढळली नाही. अज्ञात भुरट्या चोराने बसमध्ये चढत असताना ती चोरली असल्याचा संशय व्यक्त करून विकी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एप्रिल ते मे या कालावधीत नागरिक कुटुंबासह अधिक संख्येने गावी जातात. या काळात कल्याण बस आगारात भुरट्या चोरांची चोरीसाठी चंगळ असते. कल्याण बस आगाराने अशा भुरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, पकडण्यासाठी आगारात सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Story img Loader