कल्याण – वर्षा सहलीसाठी शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावरील केरला व्हिलेज या गृहप्रकल्पात रविवारी कल्याण येथून १२ तरुणांचा एक गट आला होता. या गटातील एक तरुण रविवारी संध्याकाळी खैरे गावाजवळील दुथडी भरून वाहत असलेल्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. विनायक वाझे (२९) असे या तरुणाचे नाव आहे.

रविवार संध्याकाळी उशिरापर्यंत किन्हवली पोलिसांच्या सहकार्याने जीव रक्षकांनी या बेपत्ता तरुणाचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. सोमवारी सकाळपासून जीव रक्षक गटाचे समीर चौधरी, अनिल हजारे, गजानन शिंगोळे, भावेश ठाकरे, रवींद्र मडके, रमेश डिंंगोर हे खैरे येथील केटी बंधारा आणि मुसई बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात बेपत्ता विनायकचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

विनायक वाझे हा उत्तम जलतरणपटू आणि कल्याणमधील एका व्यायामशाळेत जीम प्रशिक्षक आहे. कल्याणमधील १२ तरुणांचा एक गट रविवारी शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावरील केरला व्हिलेज या गृहप्रकल्पात वर्षा पर्यटनासाठी आले होते. दुपारी भोजन केल्यानंतर या गटाने मुसई बंधाऱ्यातून वाहत असलेल्या ओहळात पोहण्याचा निर्णय घेतला. या ओहळाला जलसाठ्यासाठी केटी बंधारा बांधण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहापूर तालुक्यातील नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. अशा पावसात तरुणांचा गट रविवारी संध्याकाळी खैरे गावाजवळील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. या ओहळात मोठे दगड आहेत. विनायकने बंधाऱ्याच्या भिंतीवरून उडी मारताच, त्याला ओहळातील खडकाचा जोरदार फटका बसला. त्या फटक्यात तो पाण्याखाली गेला तो पुन्हा वर आला नाही. इतर तरुणांना तो डुबकी मारण्यासाठी गेला आहे असे सुरुवातीला वाटले.

हेही वाचा – ठाणे : डोंबिवलीतील कोळेगावातून प्रियकर-प्रेयसीचे अपहरण करून लोखंडी सळईने बेदम मारहाण

बराच वेळ झाला तरी विनायक पाण्यावर येत नाही पाहून तरुणांची घाबरगुंडी वळली. ओहोळाला पूर होता. ही माहिती तात्काळ स्थानिक गावकरी, किन्हवली पोलीस ठाण्याला देण्यात आली. जीवरक्षक दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्याचा दोन दिवस शोध घेऊनही तो सापडला नाही. तो ओहळातील दगडांच्या कपारीत अडकला असण्याची किंवा वेगवान पाण्यामुळे सारंगपुरी नदी भागात वाहून गेला असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.