डोंबिवली – डोंबिवली निळजे गाव हद्दीतील पलावा-लोढा हेवन बाजारपेठ भागातील शिवाजी चौक परिसरात एक फळ विक्रेता फळविक्रीच्या हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिकच्या पिशवीत लंघुशका करत आहे. लुघशंकेची पिशवी फळ विक्रीच्या प्लास्टिक खोक्यात कोंबून पुन्हा त्याच हाताने फळ विक्री करत असल्याची दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर सामायिक झाली आहे.
या किळसवाण्या प्रकाराने डोंबिवली, पलावा, निळजे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. समाज माध्यमांवर या फळ विक्रेत्याची दृश्यचित्रफित सामायिक होताच, मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, या दृश्यचित्रफितीची सत्यता आणि संबंधित फळ विक्रेत्याचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत तरुणाच्या अंगावर मोटार घालून फरफटत नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न
निळजे गाव परिसरातील रहिवाशांनी सांगितले, पलावा, लोढा हेवन भागातील वस्ती वाढत असल्याने निळजे गाव हद्दीत बाजारपेठ वाढत आहे. गावदेवी चौक, शिवाजी चौक, पलावा चौक, लोढा हेवन रस्त्यावर भाजी, फळ विक्रेते सकाळपासून ते रात्रीपर्यंत या भागात विक्रीसाठी बसलेले असतात. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे फळ, भाजी विक्रेते आजुबाजूची दुकाने, आडोसे घेऊन लघुशंका करतात. काही विक्रेते प्लास्टिक पिशवीत लघुशंका करून ती नंतर फेकून देत असावेत. पण, एक विक्रेता फळ विक्रीच्या हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका करतो. आणि ती पिशवी नंतर फळ विक्रीच्या प्लास्टिक खोक्यात कोंबून ठेवतो. तेच लघुशंकेचे हात स्वच्छ न धुता फळ विक्रीसाठी वापरत असल्याचे दृश्यचित्रफितीमधून दिसत आहे. असे प्रकार दररोज होत असण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. हा प्रकार आता उघड झाला आहे. या किळसवाण्या प्रकाराविषयी डोंबिवली परिसरातील नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. याविषयी कल्याण डोंबिवली पालिका, पोलिसांनी या विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
हेही वाचा – ठाणे : भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू ,क्रिकेटच्या फळीने डोक्यात मारहाण
हा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर निळजे बाजारपेठेत सुमारे दीड हजार लोकांचा जमाव जमला होता. पालिकेच्या ई प्रभागाचे फेरीवाले हटाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत तेथून फेरीवाले गायब झाले होते. पालिकेने या फेरीवाल्यावर कारावई करण्याचा निर्णय घेतला आहे.