डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील स्कायवाॅकवर एका द्राक्ष विक्रेत्याने एका ग्राहकाला एक किलो द्राक्षांच्या खरेदीत वजनात खोट करून ८०० ग्रॅम वजनाची द्राक्षे दिली. हा प्रकार जागरुक ग्राहकाच्या निदर्शनास येताच त्याने माघारी येऊन विक्रेत्याला जाब विचारून त्याला चांगला चोप दिला. द्राक्ष विक्रेत्याने आपण वजन मापात तांत्रिक बिघाड करून ग्राहकाला कमी द्राक्ष मिळतील अशी व्यवस्था केल्याची कबुली उपस्थित पादचाऱ्यांसमोर दिली.
डोंबिवली पूर्व भागातील स्कायवाॅकवर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव आहे. फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाकडून फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई केली जात नसल्याने आणि हटाव पथकातील एक कामगार (अलीकडे घनकचरा विभागात बदली) फेरीवाल्यांची हप्त्यासाठी पाठराखण करतो. त्यामुळे या कामगाराच्या इशाऱ्यावरून रेल्वे स्थानक भागात फेरीवाले बसतात. शनिवार रात्री एक फेरीवाला स्कायवाॅकवर द्राक्ष विक्रीसाठी बसला होता. येणारे जाणारे ग्राहक त्याच्याकडून द्राक्ष खरेदी करत होते.
एका ग्राहकाने स्वस्तात द्राक्षे मिळतात म्हणून एक किलो द्राक्षे विक्रेत्याकडून खरेदी केली. तेवढी रक्कम विक्रेत्याला दिली. आपण खरेदी केलेली द्राक्ष एक किलो वाटत नाहीत असा संशय आल्याने त्या ग्राहकाने दुसऱ्या एका ग्राहकाकडे जाऊन द्राक्षांचे वजन केले. त्यावेळी ते फक्त ८०० ग्रॅम भरले. विक्रेत्याने आपल्याला उघडपणे फसविल्याचे निदर्शनास आल्यावर ग्राहक पुन्हा माघारी फिरला. त्याने विक्रेत्याला जाब विचारून त्याला चोप दिला. इतर प्रवाशांनी त्या विक्रेत्याला जाब विचारताच त्याने आपण वजन काट्यात फेरबदल केला असल्याची कबुली दिली. ग्राहकाचे एक किलोचे घेतलेले पैसे त्याने परत केले. रेल्वे स्थानक भागातील फळ विक्रेत्यांकडून वजन काट्यावर वस्तू घेताना तपासून घ्या, असे आवाहन ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.