बदलापूर: वैयक्तिक कारणाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एका तरुणीने बुधवारी रात्री उडी मारली खरी, मात्र नदीत प्रदूषणामुळे तयार झालेल्या जलपर्णीच्या थराने या तरुणीचे प्राण वाचवले आहे. बदलापूर शहरातील पश्चिम भागातून वालवली येथून उल्हास नदी वाहते. याच ठिकाणी पुलावर हा प्रकार घडला. स्थानिकांच्या मदतीने तरुणीचे प्राण वाचले आहेत.
बदलापूरच्या वालीवली परिसरातील उल्हास नदी वाहते. येथे बुधवारी रात्री एका तरुणीने आत्महत्या करण्याच्या हेतूने थेट नदीत उडी घेतली. मात्र उल्हासनदीत प्रदूषणामुळे सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही तरुणी या जलपर्णीत अडकली. याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवली. त्यानंतर तात्काळ प्राणी मित्र आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मनोहर मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात मनोहर मेहेर हे सुरक्षा साधने परिधान करून दोरीच्या साह्याने नदीत उतरले. नदीतील जलपर्णीत अडकलेल्या या तरुणीला मेहेर आणि गावकरी यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. त्या तरुणीवर सध्या बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जलचर आणि मानवी जीवनाला हानिकारक ठरणाऱ्या जलपर्णीचा या तरुणीला मात्र फायद्याचे ठरली.