कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री ८.५५ वाजता टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा एक डबा रूळावरून घसरला. यामध्ये कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही. घसरलेला डबा सुस्थितीत करून रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरून टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याण दिशेकडील गार्डचा डबा रूळावरून घसरला. रूळावरून डबा घसरल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट पसरली. थोड्या वेळाने रूळावरून डबा घसरल्याचे प्रवाशांना समजले.

हेही वाचा >>>लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

या घटनेमुळे कर्जत, कसाराकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या, कल्याणकडे येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. कल्याणकडे येणाऱ्या काही लोकल डोंबिवली, ठाकुर्ली दिशेने खोळंबल्या. बराच उशीर लोकल सुरू होत नसल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गातून प्रवास करून ठाकुर्ली, कल्याण रेल्वे स्थानके गाठणे पसंत केले आहे. तर काही लोकल शहाड, विठ्ठलवाडी भागात खोळंबल्या. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडला.

हेही वाचा >>>राज यांच्या ‘चवदार’ भेटीत कार्यकर्त्यांची मने मात्र कडू !

ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात खोळंबलेल्या लोकलमधील प्रवासी रेल्वे मार्गातून पत्रीपुलाखालून कल्याण रेल्वे स्थानकाकडे येत आहेत. तर काही प्रवासी पत्रीपुलावरून रिक्षेने इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. शहाड, विठ्ठलवाडी भागातील प्रवासी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जात होते. नोकरदारवर्ग घरी परतण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते. याच वेळेत पाऊस सुरू असल्याने अनेक प्रवासी चिंब झाले होते. रेल्वेच्या तांत्रिक विभागाने डबा रूळावरून सुस्थितीत करण्याचे काम सुरू केले होते. डबा घसरलेल्या लोकल भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.