ठाणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिस ई- चलानद्वारे दंडात्मक कारवाई करतात. हा दंड अनेक वाहन चालक प्रलंबित ठेवत असून त्याच्या वसुलीसाठी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. आज, शनिवारी सकाळी १०.३० ते ५.३० यावेळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे ही लोकअदालत होणार आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. सिग्नल ओलांडणे, थांब रेषेवर वाहन नेणे, विना शिरस्त्राण दुचाकी चालविणे, दुचाकीवर तीन जण प्रवास करणे अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात. ई-चलानद्वारे ही कारवाई करण्यात येते.
हेही वाचा… कल्याण – डोंबिवली मध्ये मुसळधार पाऊस
संबंधित वाहन चालकांच्या मोबाईल क्रमांकावर दंडाच्या रकमेचा संदेश पाठविण्यात येतो. अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या वाहन चालकाने वारंवार नियमांचे उल्लंघन केले तर त्याची दंडाची रक्कम वाढत जाते. अशा वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून खटला भरण्यात येतो. वाहनाच्या किमतीपेक्षा दंडाची रक्कम ही जास्त असल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना दंडाची रक्कम कशी भरावी असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा… मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
ठाणे आयुक्तालयात आतापर्यंत ५२ कोटी रुपयांहून अधिकचा दंड ई-चलानद्वारे आकारला आहे. यातील ४६ कोटी रुपयांहून अधिकचा दंड अद्याप भरण्यात आलेला नाही. त्यामुळे तडजोडीअंती दंडाची रक्कम काही प्रमाणात कमी केली जाणार आहे. त्यासाठी लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे कसूरदार वाहन चालकांनी त्यांच्या परिसरातील वाहतूक शाखेच्या उपविभागात संपर्क साधून लोकअदालती संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सेवा विधी प्राधिकरण येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लोकअदालतीसाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.