महिलांचे आणि अल्पवयीन मुलींचे आंघोळ करताना व्हिडीओ काढणाऱ्या विकृताला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 34 वर्षीय आरोपी अंधेरीतील एका कंपनीत इंजिनिअर पदावर आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोपीने आयआयटी बॉम्बेमधून पदवी शिक्षण घेतलेलं आहे. महिला बाथरुममध्ये असताना आरोपी व्हिडीओ काढत होता. यावेळी शेजाऱ्याने रंगेहाथ त्याला पकडलं.
पोलिसांनी आरोपीचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये बिल्डिंगमधील काही अल्पवयीन मुलांचे आणि मुलींचेही व्हिडीओ असल्याचं समोर आलं. पोलिसांनी पॉस्को अंतर्गतही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
कापुरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इमारतीतील रहिवाशांनी ओढत आरोपीला पोलीस ठाण्यात आणलं. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता आरोपीला महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढताना रंगेहाथ पकडलं असल्याचं रहिवाशांनी पोलिसांना सांगितलं.
‘रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने फोनचा फ्लॅश पाहिल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. तिने तात्काळ आपल्या पतीला कळवलं. आरोपीला पकडण्यासाठी त्यांनी तात्काळ धाव घेतली. मोबाइल तपासला असता व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं समोर आलं. नंतर मारहाण करत पोलीस ठाण्यात आणलं’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मोबाइल तपासला असता पोलिसांना मोबाइलमध्ये तक्रारदार महिलेसह इतर लहान मुलांचे आणि मुलींचे व्हिडीओ सापडले. पायऱ्यांजवळ असणाऱ्या बाथरुमजवळ उभे राहून हे व्हिडीओ शूट करण्यात आले होते. ‘आम्ही आरोपीचा मोबाइल जप्त कलेा आहे. आम्हाला 13 वर्षांच्या मुलीचा आणि एका मुलाचा व्हिडीओही सापडला आहे’, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून कोणताही जबाब देण्यास नकार देत आहे.