शेअर बाजारात गुंतवणूक करा, तुम्हाला आकर्षक व्याजाचा परतावा मिळेल असे सांगून शेअर्सचे व्यवहार करणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फडके छेद रस्त्यावरील एका खासगी आस्थापनाने एका सेवानिवृत्त नोकरदाराची १३ लाख ८० हजार रूपयांची फसवणूक केली. सेवानिवृत्ताने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खासगी आस्थापना चालका विरुद्ध तक्रार केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रसाद शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. त्याचे मिडास इन्व्हेसमेंट खासगी आस्थापनेचे कार्यालय डोंबिवली पूर्वेतील फडके छेद रस्त्यावरील रोशन ऑटोमोबाईल जवळ, सुभाष डेअरीच्या पुढे आहे. तक्रारदार सुधाकर गणपत होले(६०) हे निवृत्त कर्मचारी आहेत. ते डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा येथील ओम सूर्या सोसायटीत राहतात. निवृत्तनंतर मिळालेली १५ लाख रूपयांची रक्कम चांगल्या गुंतवणूक योजनेत गुंतवली तर आपणास आकर्षक परतावा मिळेल, या विचारात सुधाकर होले होते. त्यांची भेट मिडास इन्व्हेस्टमेंटचे प्रसाद शुक्ला यांच्या बरोबर झाली. प्रसाद यांनी सुधाकर यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर व्याज देतो असे खोटे आमीष दाखविले.

प्रसाद यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सुधाकर यांनी १५ लाख रूपयांची रक्कम सहा वर्षापूर्वी भारतीय महिला बँक, डी. एन. सी. बँक खात्यात जमा केली होती. या खात्यामधून प्रसाद शुक्ला यांनी एक लाख २० हजार सुधाकर होले यांना परत केले. उर्वरित रकमेवर आकर्षक व्याज देण्याची मागणी करूनही प्रसाद ती रक्कम होले यांना देत नव्हता. व्याजा बरोबर आपली मूळ १३ लाख ८० हजार रूपयांची रक्कम परत करण्याचा तगादा सुधाकर होले यांनी प्रसाद यांच्यामागे लावला होता. ते रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत होते. प्रसाद शुक्ला आपली फसवणूक करत आहेत याची खात्री झाल्याने सुधाकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नागरिकांनी पैसे, सोन्याची गुंतवणूक करताना संबंधित संस्था, व्यक्ति खात्रीशीर आहे की नाही याची चाचपणी करूनच मगच गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Story img Loader