ठाणे : दरवाजात उभे राहिल्याने एका प्रवाशाला दिवा स्थानकात १० ते १२ प्रवाशांनी रेल्वेगाडीतून खाली खेचून फलाटावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. परंतु या प्रकरणात मारहाण झालेल्या व्यक्तीने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

हेही वाचा – ठाणे: पाणीपुरी खाण्यास पैसे दिले नाही म्हणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

हेही वाचा – डोंबिवलीत दूध डेअरीमधून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वीचा या मारहाणीचे चित्रीकरण प्रसारित झाले. दिवा रेल्वे स्थानकात कर्जत रेल्वेगाडी आली असता, रेल्वेगाडीत प्रवाशांच्या चढण्या-उतरण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादात कर्जत येथे राहणाऱ्या एका प्रवाशास दिवा रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांनी खेचून रेल्वेगाडीतून बाहेर काढले. त्यानंतर या प्रवाशांच्या टोळीने त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान याप्रकरणात मारहाण झालेल्या व्यक्तीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परंतु त्याने याप्रकरणात तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Story img Loader