कल्याण: पंधरा वर्षापूर्वी डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी शाळेत जात असताना अपहरण करून त्याला बदलापूर जवळील जंगलात ठार मारणाऱ्या दिवा, डोंबिवलीतील आजदे गावातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाने मोक्काच्या आरोपातून निर्दोष सुटका केली.
मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेटे यांनी हा निर्णय देताना या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डोंबिवलीतील पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गंभीर त्रृटी ठेवल्या. सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले नाही. त्यामुळे या गंभीर गुन्ह्यातील मोक्का आरोपींना तपासातील संशयावरून मोक्काच्या आरोपातून निर्दोष सोडण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दिवा गावातील किशोर रमेश शिंदे (३६), आजदे गावातील राकेश मदल लाखरा (३७), जाॅय तिमीर चौधरी (४२), संतोष देवेंद्र पडचिंते (३६) अशी मोक्कातून निर्दोष सुटका झालेल्या इसमांची नावे आहेत. विशेष सरकारी वकील ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयाला सांगितले, यश शहा (१४) हा डोंबिवलीतील त्याच्या शाळेत २५ जून २००९ रोजी पायी चालला होता. वाटेत त्याला आरपींनी गाठले. त्याला आमिष दाखवून त्याचे चार जणांनी अपहरण केले. मुलगा शाळेत गेला नाही म्हणून त्याचा शोध कुटुंबीय, पोलिसांकडून सुरू झाला. दरम्यान आरोपींनी यशच्या कुटुंबीयांकडे २० लाख रूपयांची खंडणी देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. वेळेत खंडणी न मिळाल्याने आरोपींनी मुलाला बदलापूर जवळील येवा गाव हद्दीतील जंगलात मारून टाकून दिला होता.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट संजय मोरे यांनी मोक्का न्यायालयाला सांगितले, २५ जून २००९ मध्ये डोंबिवलीतील यश शहा (१४) हा मुलगा शाळेत चालला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला वाटेत गाठून त्याचे अपहरण केले. मुलगा शाळेत गेला नाही म्हणून त्याचा शोध सुरू असताना यशच्या कुटुंबीयांना आरोपींनी २० लाख रूपयांची खंडणी मागण्यास सुरुवात केली. खंडणी दिली नाहीतर मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. वेळेत पैसे न मिळाल्याने आरोपींनी मुलाला बदलापूर जवळील येवे गाव हद्दीतील जंगलात मारून टाकून तेथेून पळून गेले होते. डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संघटितपणे हे कृत्य केल्याने आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. २७ साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले होते.
मोक्का न्यायालयात आरोपींचे वकील पंकज कावळे, एस. बी. पवार, सागर कोल्हे यांनी सरकार पक्षातर्फे मांडलेले मुद्दे खोडून काढले आणि या प्रकरणाशी आरोपींचा काहीही संबंध नसल्याचे साक्षी पुराव्याने सिध्द केले. हेतुुपुरस्सर तपास यंत्रणेने आरोपींना या प्रकरणात गोवले असल्याचे न्यायालयाला सांगितले. मोक्का न्यायालयाने सरकार पक्ष आणि आरोपी वकिलांची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना अक्षम्य चुका केल्या आहेत. गंभीर त्रृटी ठेवल्या आहेत. आरोपींविषयी सबळ पुरावे न्यायालयासमोर दाखल करताना गलथानपणा करण्यात आला आहे, असे ताशेरे न्यायालयाने पोलिसांवर ओढले. हे प्रकरण गंभीर असले तरी आरोपींविरोधात सबळ पुरावे सरकार पक्षाकडे नसल्याने त्यांची मोक्का आरोपातून निर्दाेष मुक्तता करण्यात येत आहे, असे आदेश न्यायालयाने दिले.