कल्याण – कल्याणमधील अटाळी भागात शुक्रवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने कार चालविताना समोरून येत असलेल्या मोटारीला जोराची धडक दिली. या धडकेत समोरील कारमधील चालक किरकोळ जखमी झाला. या धडकेनंतर अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदारांना बोलावून समोरील कार चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
ही अपघाताची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंंतर खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन कार चालकाचे वडील राजाराम चौधरी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलावर स्वताहून गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी माध्यमांना दिली.
पोलिसांनी सांगितले, अल्पवयीन मुलगा शुक्रवारी मध्यरात्री ब्रिझा कार घेऊन कल्याणकडून अटाळीकडे सुसाट वेगाने घरी चालला होता. अटाळी चौकात आरोपी मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येत असलेल्या किया कारला जोराने धडकली. किया कारचा चालक यात किरकोळ जखमी झाला. आरोपी मुलगा आणि किया कारमधील चालक यांच्यात अपघातावरून वाद झाला. चूक अल्पवयीन मुलाची असताना तो समोरील कार चालकाला दटावणी करू लागला. यावेळी आरोपी मुलाने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. किया कारमधील चालकाला त्यांची कोणतीही चूक नसताना मारहाण केली.
हेही वाचा – राबणाऱ्यांसाठी हक्काच्या, सुरक्षित घरांचा ठाणे पॅटर्न ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’
आरोपी मुलाचे वडील एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. पुण्यासारखे प्रकरण कल्याणमध्ये घडल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कल्याणमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.