डोंबिवली – ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील गर्द झाडीत एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून दोन २५ ते ३० वयोगटातील अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले, अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र शुक्रवारी दुपारी ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण पीडित तरुणी आणि तिच्या मित्राजवळ आले. त्यांनी दोघांना ‘आम्ही पोलीस आहोत. तुमची चौकशी करायची आहे,’ अशी बतावणी करून पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला खाडी किनारच्या झुडपांमध्ये निर्जन स्थळी नेले. पोलीस असल्याने पीडित तरुणी आणि मित्र घाबरले होते. निर्जन स्थळी जाताच तोतया पोलिसांमधील एकाने पीडित तरुणीचे काही ऐकून न घेता तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितीने प्रतिकार केला, पण त्यास दाद दिली नाही. शारीरिक संबंधाचे हे चित्रीकरण दुसऱ्या तोतया पोलिसाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. घडला प्रकार कोणाला सांगितला तर ‘आम्ही तुझी समाज माध्यमांवर बदनामी करू,’ अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराने पीडित तरुणी आणि तिचा मित्र भेदरले होते.

हेही वाचा – ‘शिवसेनेचे ठाणे ‘ ठाकरे की शिंदे गटाबरोबर ?

पीडिता दोघा तोतया पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी दुसऱ्या तोतया पोलिसाने ‘तुला मी त्याच्या तावडीतून सोडवून ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात सोडवितो’ असे बोलून तरुणीला फसवून खाडी लगतच्या झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर त्यानेही लैंगिक अत्याचार केला. बचावासाठी ओरडा केला तर तोतया पोलिसांकडून जिवाचे बरेवाईट होईल या भीतीने मोठ्या शिताफीने पीडितेने दोन्ही तोतया पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतली. आता पीडित तरुणीकडून बचावासाठी ओरडा केला जाईल या भीतीने दोन्ही तोतया पोलीस घटनास्थळावरून पळून गेले.

ठाकुर्लीत दिवसाढवळ्या घडलेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणाने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून आरोपींच्या तपासासाठी पाच पथके स्थापन करून विविध भागांत रवाना केली आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे, असे भालेराव यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाणे: भिवंडीत दीड वर्षीय मुलाचे अपहरण आणि सुटका

डोंबिवली, ठाकुर्ली परिसरातील अनेक नागरिक, प्रेमी युगले फिरण्यासाठी मोकळी जागा म्हणून दररोज गणेशनगर, ठाकुर्ली परिसरात येतात. रात्री उशिरापर्यंत या भागांत नागरिक व्यायामाचा भाग म्हणून फिरतात. अनेक प्रेमीयुगले या भागात झुडपांचा आधार घेऊन बसलेली असतात. त्याचा गैरफायदा तोतया पोलिसांनी घेतला असावा, असे नियमित या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी गणेशनगर, ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl was rape by fake police in thakurli in thane ssb