कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील उच्चभ्रुंची वस्ती असलेल्या एका इमारतीच्या आवारात एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीला आला. सर्वाधिक वर्दळीच्या भागात ही घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिम बस आगारा जवळ न्यू मोनिका उच्चभ्रूंची वस्ती असलेले गृहसंकुल आहे. या इमारतीच्या आवारात एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन एका १५ वर्षाच्या तरुणाने तिची गळा चिरुन हत्या केली. पहाटेच्या वेळेत हा प्रकार घडला. हे दोघेही फिरस्ते आहेत.
रस्त्यावरुन येजा करणाऱ्या पादचाऱ्यांना न्यू मोनिका सोसायटीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात एका मुलीचा मृतदेह पडला असल्याचे सकाळी दिसले. ही माहिती पादचाऱ्यांनी सोसायटी सदस्यांना दिली. त्यानंतर ही माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला.
पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी तातडीने आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या. या गृहसंकुलाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्यावेळी एक तरुण एका तरुणीला सोसायटीच्या आवारात घेऊन येत आहे असे दिसले. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. महात्मा फुले पोलीस ठाण्याची तपास पथके तात्काळ कामाला लागली. मुलीवर अत्यार आणि तिची हत्या करणारा तरुण कुठेही पळून जाऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. या तपासाच्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी करताच त्याने आपण मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील भूमाफियांनी शासनाचा २५०० कोटीचा महसूल बुडविला
अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले, या मुलीच्या वडिलांनी काही दिवसापूर्वी आपणास मारहाण केली होती. त्याचा आपणास राग होता. तो वचपा काढण्यासाठी आपण या मुलीची धारदार पातेने गळा चिरुन हत्या केली. या मुलाच्या हिंस्त्रतेविषयी पोलीसही हैराण झाले. एवढ्या लहान वयात एवढी क्रुरता आली कोठुन असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. बाललैंगिक अत्याचार कायद्याने आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.