कल्याण- कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात १४ वर्षाच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर याच भागातील एका तरुणाने बलात्कार केला. मुलगी शिकवणीवरुन घरी परत येत असताना तरुणाने तिला वाटेत गाठून तिला आड बाजुला नेले. तिच्यावर बलात्कार केला. कोळसेवाडी पोलिसांनी तक्रार दाखल होताच, तात्काळ तपास सुरू करुन तरुणाला अटक केली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.विशाल गवळी असे अटक तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, पीडित अल्पवयीन मुलगी बुधवारी संध्याकाळी शिकवणी वर्गावरुन घरी जात होती. आरोपी विशाल याने त्या मुलीचा पाठलाग करुन तिला दमदाटी करत तिला आडबाजुला नेले. तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार केला. त्याला विशालने दाद दिली नाही. विशालच्या तावडीतून सुटल्यावर पीडितेने घरी येऊन रस्त्यात घडला प्रकार सांगितला.
पीडितेच्या आई, वडिलांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्याला बुधवारी रात्रीच कल्याण पूर्व भागातून अटक केली. विशालवर यापूर्वी तडिपारीची कारवाई झाली आहे. तडीपारी संपल्याने तो पुन्हा कल्याणमध्ये आला आहे. त्याने पूर्वीचे आपले गुन्हेगारीचे धंदे सुरू केले आहेत.विशालच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने पोलीस पुन्हा त्याच्या विषयीचा अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठविण्याच्या तयारीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात १५ ऑगस्टला ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद
विशाल गवळीला अटक केल्यानंतर त्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दोन बोटे उंचावून विजयाची खूण केल्याने उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशालला पु्न्हा तडीपाराची अद्दल पोलिसांनी घडवावी, अशी मागणी कल्याण मधील नागरिकांकडून केली जात आहे.