ठाणे : कुंभमेळ्यासाठी गेलेल्या ठाणेकराचा एक लाख ३० हजार रुपयांचा मोबाईल रेल्वेमधील चोरट्याने चोरी करत त्या मोबाईलचा गैरवापर करून बँक खात्यातील एक लाख ४६ हजार ७०१ रुपये युपीआय तसेच इतर माध्यमातून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मोबाईल वाराणसी रेल्वे स्थानकात चोरीला गेल्याने तेथील पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे देशभरातून नागरिक या कुंभमेळ्यासाठी जात आहेत. ठाण्यातील राबोडी भागात राहणारे ५३ वर्षीय व्यवसायिक देखील १७ फेब्रुवारीला कुंभमेळ्यासाठी गेले होते. देवदर्शन केल्यानंतर ते ठाण्यात परतण्यासाठी रविवारी वाराणसी येथून गोरखपूर एक्स्प्रेसने निघाले होते. ते रेल्वे डब्यामध्ये शिरत असताना त्यांच्या पँटच्या खिशातील एक लाख ३० हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने त्यांच्या नकळत काढला. सोमवारी पहाटे ५.३० वाजता ते ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ते घरी निघून आले.
सोमवारी दुपारी त्यांच्या कंपनीतील कर्मचारी त्यांच्या बँकेची खातेपुस्तिका घेऊन बँकेत गेल्या असता, त्यांच्या चोरीच्या मोबाईलमधून काही रक्कम काढून घेण्यात आल्याचे समोर आले. त्यांनी बँक खात्यातील व्यवहार तपासला असता, त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ४६ हजार ७०१ रुपये चोरट्याने मोबाईलचा वापर करत युपीआय तसेच इतर ऑनलाईन माध्यमातून पैसे काढून घेतल्याचे समोर आले. गुन्ह्याचे घटनास्थळ हे प्रयागराज पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील असल्याने वाराणसी कँट रेल्वे पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.