कल्याण : कल्याण येथील पूर्व भागातील चिंचपाडा विभागात पूजा ॲनेक्स मोबाईल विक्रीच्या दुकानात मंगळवारी रात्री चोरी करुन चोरट्यांनी चार लाख १० हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल चोरुन नेले. ओप्पो, व्हिवो, टेक्नो कंपनीचे हे मोबाईल आहेत. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागात राहणाऱ्या दुकान मालक सुनील त्रिपाठी यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ते दुकान उघडण्यासाठी गेले.
त्यांना दुकानाचा मुख्य दरवाजा, संरक्षित लोखंडी दरवाजा, आतील लोखंडी व्दार तुटले असल्याचे आढळून आले. दुकानात चोरी झाल्याचा संशय आल्याने सुनील दुकानात गेले. त्यांना दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले ओप्पो, व्हिओ, टेक्नो कंपनीचे चार लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याचे दिसले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सुनील त्रिपाठी यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. कल्याण पूर्व भागात गेल्या वर्षापासून चोऱ्या वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.