ठाणे – शहाराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरुन किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरुन ठरत नाही तर, त्या शहरात असलेले संस्कार, शहरात असलेले स्टेडियम, नाट्यगृह, महाविद्यालय, तरण तलाव, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू, ग्रंथालये यावरुनच ठरत असते. या ठाणे शहराला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनविण्याचे काम सतिश प्रधान यांनी केले. त्यामुळे या ठाणे शहरात सतिश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचे आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्व. सतीश प्रधान यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खासदार नरेश म्हस्के पुढे म्हणाले, ठाणे शहराला आकार देण्याचे काम प्रधान यांनी केले. त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहराने राष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटवला आहे. तर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी सतिश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायी आहेत, अशी भावना व्यक्त केली.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई

आमदार निरंजन डावखरे हे भावना व्यक्त करताना म्हणाले की, असे कोणतेही क्षेत्र नाही, त्याला प्रधानांचा स्पर्श झालेला नाही. प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते, असे ते म्हणाले. माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतिश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या. प्रधान यांचे ठाण्यातील भरीव कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले.

या शोकसभेत लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली. यावेळी प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रधान यांनी ठाण्याला ओळख दिली – शिवसेना (उबाठा) ज्येष्ठ नेते सुभाष देसाई

प्रधान यांनी ठाण्याला ओळख निर्माण करून दिली. ठाणे शहर हे नेहमीच उपक्रमशील राहण्यासाठी सर्व क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. ते शिवसेनेमधील कार्य करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असायचे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले.

हेही वाचा – कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फलक कमानी, निवारे जमीनदोस्त

वडिलांप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहील – कमलेश प्रधान

शिक्षण, खेळ आणि सामाजिक संस्थांच्या उभारणीत वडिलांनी दिलेला हातभार कायम स्मरणात राहील. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे काम करण्याचा निर्धार सतिश प्रधान यांचा मुलगा कमलेश प्रधान यांनी केला. वडिलांच्या मार्गदर्शनाने मला विचार करण्याची आणि समाजसेवेसाठी तत्पर राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या विचारांचा आधार घेत, महाविद्यालयाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहू, असे म्हणत त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A monument named after satish pradhan will be erected in thane city mp naresh mhaske assurance ssb