ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी तक्रारी कुठे करायच्या असा प्रश्न निर्माण होत असे. अनेकदा तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून मुख्यालय, मुख्यालयातून पोलीस ठाणे अशा फेऱ्या मारायला लागत होत्या. या त्रासामुळे तक्रारदारही पुढे येत नसत. ठाणे आयुक्तायल क्षेत्रात नागरिककरण वाढल्याने येथे सायबर पोलीस ठाणे व्हावे अशी मागणी केली जात होती. अखेर पोलीस ठाणे बांधून तयार झाले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच या पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची शक्यता आहे. पोलीस ठाणे सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह ३० ते ४० अधिकारी कर्मचारी असणार आहे. त्यांच्या नेमणूका करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा… कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना तीन भामट्यांनी प्रवाशाला लुटले
गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत. ठाण्यात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून बँक खाते रिकामे करणे, ऑनलाईन ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकरणांची सर्वाधिक वाढ आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण-तरुणींचे प्रमाणही अधिक आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र असे पोलीस ठाणे नाही.
ठाणे पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर सायबर कक्ष आहे. परंतु येथे गुन्हे दाखल होत नाही. नागरिक सायबर कक्षामध्ये आल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या ठिकाणी गुन्हा घडला. तेथील पोलीस ठाणे गाठावे लागते. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतरही तेथे इतर तक्रारी देण्यासाठी अनेकजण आलेले असतात. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीला ताटकळत राहावे लागते. सायबर कक्ष आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्यामुळे अनेकदा फसवणूक झालेला व्यक्ती तक्रार देण्यासही टाळाटाळ करतो.
हे ही वाचा… कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद
राज्यात काही ठराविक क्षेत्रातच सायबर पोलीस ठाणे आहेत. जिल्ह्यातील ठाणे शह पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. आयुक्तालयाच्या लोकसंख्येनुसार येथेही सायबर पोलीस ठाणे उपलब्ध व्हावे अशी मागणी केली जात होती. काही महिन्यांपासून पोलीस मुख्यालयाच्या एका पडीक जागेत ठाणे शहर सायबर पोलीस ठाण्याच्या निर्माणाचे काम सुरू होते. या पोलीस ठाण्याचे बांधकाम आता जवळपास पुर्ण झाले असून रंगरंगोटीची कामे शिल्लक आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन पूर्ण होणार आहे.
पोलीस ठाणे निर्माण झाल्यास काय होईल ?
सायबर पोलीस ठाणे तयार झाल्यास नागरिकांंना ऑनलाईन फसवणूकीच्या तक्रारी थेट या सायबर पोलीस ठाण्यात दाखल करता येणार आहे. पूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत होते. या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांचा तपास सुरू असतो. त्यात सायबर गुन्हे दाखल होत असल्याने पोलिसांना देखील ताण येत असतो. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध प्रलंंबित असतो. आता सायबर पोलीस ठाणे निर्माण झाल्याने हे गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण घटणार आहे. नव्या सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी, त्याच्यासह इतर ३० ते ४० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतील.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सायबर पोलीस ठाणे लवकरच सुरू होणार आहे. ज्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना या सायबर पोलीस ठाण्यात काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस.