डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथे एक एकरच्या हरितपट्ट्यात शिव सावली हा १० इमारतींचा बेकायदा गृहप्रकल्प सुरू असताना, या प्रकल्पाच्या बाजूला खंडोबा मंदिराच्या पाठीमागील भागात भूमाफियांनी गेल्या महिन्यापासून नव्याने एका बेकायदा इमारतीच्या उभारणीला सुरुवात केली आहे.
ही इमारत बांधून पूर्ण होण्याच्या अगोदरच पालिका अधिकाऱ्यांनी भुईसपाट करावी म्हणून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमींना पालिकेच्या आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ह प्रभागात तक्रारी केल्या आहेत. आता २५ दिवस उलटले तरी या नव्याने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामावर उपायुक्त अतिक्रमण, ह प्रभाग कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हरितपट्टा उद्ध्वस्त
डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा, गणेशनगर, देवीचापाडा, कोपर हा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. या भागात नागरिक फिरण्यासाठी येतात. या हरितपट्ट्यात पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफिया प्रफुल्ल गोरे, नंंबियार, सिद्धेश कीर यांनी १० बेकायदा इमारतींचा गृह प्रकल्प प्रस्तावित केला आहे. पाच इमारतींची बेकायदा बांधकामे पूर्ण झाली आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी जाण्यासाठी पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता प्रस्तावित नाही. तरीही भूमाफियांनी खारफुटी तोडून बेकायदा रस्ते तयार केले आहेत. महावितरणने यामधील काही इमारतींना नियमबाह्य वीजपुरवठा दिल्याची तक्रार निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर यांनी केली आहे. हरितपट्ट्यातील सर्व बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, अशी मागणी तक्रारदार विनोद जोशी यांनी शासनाकडे केली आहे. यासाठी त्यांचे मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाच्या आदेशावरून ह प्रभागाने या भागातील एका इमारतीवर कारवाई केली होती.
या इमारतींच्या कारवाईचा विषय प्रलंबित असताना आता माफियांनी खंडोबा मंदिराच्या पाठी मागील बाजूला हरितपट्ट्यात बेकायदा इमारत उभारणीचे काम घाईघाईने सुरू केले आहे. या इमारतीला नगररचना विभागाची परवानगी नाही, असे नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ह प्रभागाने या बेकायदा इमारतीवर कारवाई केली नाहीतर या प्रकरणाची शासनाकडे तक्रार केली जाणार आहे, असे तक्रारदार विनोद जोशी यांनी सांगितले.
शासन आदेश दुर्लक्षित
कुंंभारखाण पाड्यातील हरितपट्ट्यातील बेकायदा इमारतींवर कारवाई करून त्याचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना २ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. आता महिना होत आला तरी पालिकेने डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे पालिका अधिकारी हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामांची पाठराखण करत आहेत, असे तक्रारदार जोशी यांनी सांगितले. जोपर्यंत हरितपट्ट्यावरील बांधकामे जमीनदोस्त केली जात नाहीत तोपर्यंत आपले आझाद मैदानातील साखळी उपोषण सुरूच राहणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे उपोषण करण्याचा विचार करत आहोत, असे जोशी यांनी सांगितले.