हातगाडीची फळी पाडल्याचा जाब विचारल्याने दोन अल्पवयीन मुलांनी पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करून त्याच्या पोटात चाकू भोसकून हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- ठाण्यातील सेवा रस्ते बेकायदा पार्किंगच्या विळख्यात; दुतर्फा पार्किंगमुळे होतेय वाहतूक कोंडी
कोपरी येथील ठाणेकरवाडी परिसरातील रस्त्याकडेला विजय मुदलवाल (३१) हा हातगाडीवर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवारी रात्री एक १७ वर्षीय मुलगा त्याच्या हातगाडीजवळ आला. त्यावेळी त्याच्याकडून फळी पडली. त्यामुळे विजय यांनी त्या मुलाला फळी पाडल्याचा जाब विचारला. त्यामुळे तो मुलगा आणि विजय यांच्यामध्ये वाद झाले. त्यानंतर त्या मुलाने त्याच्या मित्राला फोन करून बोलावले. मित्र त्याठिकाणी आला त्यावेळी त्याच्या हातात एक चाकूही आणला होता. या दोघांनीही विजयला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पोटात चाकू भोसकला. या घटनेत विजय गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी विजय यांनी याप्रकरणी कोपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.