ठाकुर्ली पुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या तीन चारचाकी वाहनांना मंगळवारी सकाळी रस्ते डांबर सपाटीकरण करणाऱ्या (पेव्हर) वाहनाची अचानक धडक बसली. या धडकेत चारचाकी तीन वाहने एकमेकांवर आदळली. या धडकेत वाहनांच्या मागच्या भागाचे नुकसान झाले आहे.पेव्हर वाहन चालविणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पेव्हर वाहन पुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी तीन वाहनांना धडकले. ही वाहने सारस्वत काॅलनीमधील काही मालकांची आहेत. सोसायटीच्या आवारात जागा नसल्याने या भागातील अनेक वाहन चालक ठाकुर्ली पुलाखाली वाहने उभी करतात.
हेही वाचा >>>डोंबिवली : पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून दबंगगिरी करणाऱ्या ठाकुर्लीतील बिल्डरला अटक
नेहमी प्रमाणे वाहने उभी केली असताना मंगळवारी सकाळी ठाकुर्ली पुला खालून पेव्हर वाहन चालले होते. पालिकेच्या रस्त्यांवरील डांबरीकरणाची कामे या वाहनामार्फत केली जातात. पेव्हर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटताच वाहन वेगाने पुला खालील चारचाकी वाहनांवर आदळले. तीन वाहने एकमेकांवर आदळली. पुलाखाली वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली. वाहने एकमेकांवर आदळताच मोठा आवाज या भागात झाला. सारस्वत काॅलनी भागातील रहिवासी दुर्गेश कामत घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ ही माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांना दिली. त्यांनी तात्काळ एका अभियंत्याला घटनास्थळी पाठविले. वाहन मालकाने झालेल्या वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे कबुल केले आहे.