डोंबिवली – आपण काटई येथील आमदार राजू पाटील यांचा भाचा आहोत. आपण त्यांच्या सोबतच्या बैठकीत भेटलो होतो. आपण तुम्हाला ओळखतो असे ठाणे, मुंबई परिसरातील रस्त्याने चाललेल्या पादचाऱ्यांना थांबवून सांंगायचे. पादचाऱ्यांंना बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घालून त्यांच्या जवळील सोन्याचा, रोख रक्कम घेऊन पळून जायचे. अनेक महिने आमदार पाटील यांच्या नावाने लबाड्या करणाऱ्या भिवंडीजवळील शेलार गावातील एका भामट्याला विष्णुनगर पोलिसांनी नवी मुंबईतून कौशल्याने मंगळवारी अटक केली.

विजय दत्ताराम तांंबे (५५, रा. शेलार गाव, भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ठाणे, मुंबई परिसरात अशाप्रकारचे ५० हून अधिक गुन्हे केले असल्याची कबुली विष्णुनगर पोलिसांना दिली आहे. अनेक दिवस पोलीस या भामट्याच्या मागावर होते. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले, गेल्या महिन्यात डोंबिवलीतील रेल्वे मैदान भागातील सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त गणेश कुबल महात्मा फुले रस्त्यावरील बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढल्यानंतर ते गुप्ते रस्त्यावर खरेदीसाठी गेले. गोपी माॅल भागातील रस्त्याने पायी घरी चालले होते. तेवढ्यात त्यांना एका इसमाने हाक मारून थांबवले.

हेही वाचा – बेकायदा इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनातील भूमाफियांचा डोंबिवलीतून पळ?

अनोळखी इसमाने मला ओळखले का. मी आमदार राजू पाटील यांचा भाचा. आपण एका बैठकीत भेटलो होतो असे बोलून कुबल यांच्याशी इसमाने लगट केली. आपण तुम्हाला ओळखूनही तुम्ही मला ओळखत नाहीत याचे आश्चर्य वाटते. असे बोलून कुबल यांचा विश्वास इसमाने संपादन केला. बोलण्याच्या गडबडीत इसमाने कुबल यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये रोख, गळ्यातील सोनसाखळी असा ऐवज काढून घेतला. तुम्ही वृद्ध आहात. कोणी पण ते लुटेल असे बोलून इसमाने रोख रक्कम, सोनसाखळी ऐवज एका रुमालात गुंडाळून तो कुबल यांच्या विजारीच्या मागील खिशात ठेवल्याचा भास निर्माण केला. या इसमाच्या जवळ अन्य एक इसम दूरवर उभा होता. इसमाने कुबल यांना आता तुम्ही घरी जा. ओळख ठेवा, असे बोलून कुबल यांना जाण्याचा इशारा केला. कुबल काही अंतर पुढे गेल्यावर त्यांनी मागील विजारीच्या खिशात पैसे, सोनसाखळीचे पुडके नव्हते. ते पुन्हा माघारी आले तोपर्यंत तो इसम आणि त्याचा साथीदार पुडके घेऊन पसार झाले होते.

हेही वाचा – उल्हासनगरमध्ये पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला, श्वान मालकावर गुन्हा दाखल

कुबल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गोपी माॅल भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक गहिनाथ गमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपकुमार भवर यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाला आरोपी विजय तांंबे नवी मुंबई भागात येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी नवी मुंबईत सापळा लावून आरोपी तांंबे याला अटक केली. त्याने ठाणे, मुंबई परिसरात अशाप्रकारे ५० हून अधिक गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.