ठाणे : मद्य सेवनासाठी पैसे दिले नाही म्हणून एका ५२ वर्षीय व्यक्तीच्या पोटात सुरा भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार रविवारी वागळे इस्टेट भागात समोर आला. विजय चौहान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सनी बैद (३२) याला अटक केली आहे.
रामनगर येथील वाल्मिकी पाडा भागात सनी बैद वास्तव्यास आहे. त्याला मद्याचे व्यसन आहे. रविवारी मध्यरात्री सनी बैद याने याच भागात राहणाऱ्या विजय चौहान यांच्याकडून मद्य सेवनासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यास विजय यांनी विरोध केला असता, सनी याने विजय यांच्या पोटात चाकू भोसकला. याप्रकरानंतर परिसरातील नागरिक विजय यांच्या मदतीसाठी धावून आले. सनी पळ काढत असताना नागरिकांनी त्याला पकडले. तर विजय यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सनीला अटक केली आहे.
सनी याला मद्य सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने पोटात चाकू भोसकला, असे विजय यांनी जखमी अवस्थेत असताना सांगितले. त्यामुळे त्यांच्या हत्येचे कारण समोर येऊ शकले.