मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या रेल्वे स्थानकात गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. निलेश जयस्वाल (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.
हेही वाचा- ठाणे : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यास अटक
मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ठाणे रेल्वे पोलिसांकडून ठाणे ते दिवा या रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या चित्रीकरणाची पाहणी केली जात होती. त्यावेळी या चित्रीकरणांमध्ये एक संशयीत व्यक्ती पोलिसांना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात गस्ती घालण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी तो दिवा रेल्वे स्थानकात आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याला गुन्हे प्रकटीकरण कक्षात नेऊन त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव निलेश असल्याचे सांगितले. तसेच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी निलेशला अटक केली. त्याच्या अटकेमुळे मोबाईल चोरीचे आतापर्यंत पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.