काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्य मुद्द्यावरून सत्तारूढ भाजपा आणि विरोधी पक्षात जोरदार कलगीतुरा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्यागृह यात्रेत सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा >>>करोनाच्या काळात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करणार, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा इशारा

मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत असे विधान काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी केले होते. या विधानानंतर राहुल गांधी यांच्यावर चौफेर टिका होऊ लागली. राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आक्रमक भुमिका घेतली. या दोन्ही पक्षांनी राहुल यांना प्रतिउत्तर देण्यासाठी राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रा काढली असून त्याद्वारे राहुल यांच्यावर टिकेचे आसुड ओढले जात आहेत. काँग्रेससोबत महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनीही राहुल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच, ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्यागृह यात्रेत इतर स्वातंत्र्यवीरांबरोबरच सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार असल्याची बाब पुढे आली आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसला पुनर्जिवत करण्याचे प्रयत्न सुरु

भारत जोडो यात्रा आणि हात जोडो यात्रांपाठोपाठ आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने घेतला असून या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून होणार आहे. शिवाय, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात होणार आहे. येत्या १० एप्रिलला ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यवीरांचा सन्मान म्हणून त्यांची छायाचित्र यात्रेत वापरली जणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या छायाचित्रांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान असणार की नाही, याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी या छायाचित्रांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान असेल असे स्पष्ट केले.

राहुल गांधी हे आमच्या पक्षातील मोठे नेते असून त्यांचे आदेश शिरसावंद आहेत. परंतु आमच्या पक्षात लोकशाही असल्याने आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार असतो. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तीक मत होते. ते पक्षाचे मत नव्हते. महाराष्ट्रात राहत असल्यामुळे सावरकर यांच्याविषयी आम्हालाही अभिमान आहे. त्यामुळेच सत्याग्रह यात्रेत त्यांच्या छायाचित्राला स्थान असेल. -विक्रांत चव्हाण,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

Story img Loader