ठाणे: नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येनिमित्त आयोजित करण्यात आलेली रेव्ह पार्टी एका विदेशी ‘बाबा’ला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच समाजमाध्यमावर बनविण्यात आलेल्या ‘पोस्ट’वर काही परवलीचे (कोड) शब्द वापरण्यात आले होते. त्यानुसार, अमली पदार्थांचे सेवन करणारे तरूण त्याठिकाणी जमले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासारवडवली भागात ठाणे खाडीच्या किनारी निर्जन स्थळी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकून रेव्ह पार्टी उद्ध्वस्त केली. कारवाईमध्ये पोलिसांंनी तेजस कुबल आणि सुजल महाजन यांना अटक केली आहे. तर ९५ जणांना ताब्यात घेतले होते. हे तरूण आयटी क्षेत्रातील, काॅल सेंटरमध्ये काम करणारी आहेत. तेजस आणि सुजल या दोघांना अटक करण्यात आली असली तरी आयोजकांमध्ये आणखी काही तरूणांचा सामावेश आहे. या तरूणांनी इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर पार्टीची माहिती दिली होती.

हेही वाचा… जल जीवन मिशन वेगवान; केवळ ८१ हजार ८४७ घरातील नळजोडणी बाकी

पार्टीसाठी तयार करणाऱ्या ‘पोस्ट’वर परवलीच्या शब्दांचा, चित्रांचा वापर करण्यात आला होता. अमली पदार्थांचे सेवन करणारे, ध्वनी क्षेपकावर संगीत वाजविणारे आणि अमली पदार्थांच्या तस्करांनाच या शब्दांची आणि चित्रांची माहिती असते. तसेच या पोस्टवर एका बाबाचे नाव लिहीण्यात आले होते. हा बाबा विदेशातून गोव्यात वास्तव्यासाठी आला होता. त्याचे निधन झाले असल्याने त्याला आदरांजली वाहण्यासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये वाघ, साप, जंगलाचे छायाचित्र होते. जंगलाचे छायाचित्र पोस्टवर असल्यास ही पार्टी जंगलात आयोजित केली असल्याचे त्या पार्टीमध्ये सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या तरूणांना समजत असते. असे अनेक परवलीचे शब्द, छायाचित्र तस्करांकडे असते अशी माहिती सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rave party organized on the eve of new year to pay tribute to a foreign baba in kasarvadavali thane dvr
Show comments