कल्याण: येथील पूर्व भागातील रेल्वे स्थानकावरील स्कायवाॅकवर गुरुवारी मध्यरात्री एका भामट्याने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लुटले. या अधिकाऱ्याच्या मोबाईलसह त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी भामट्याने लुटून पळ काढला.
प्रदीप मिसर (६३) असे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहतात. पोलिसांनी सांगितले, मिसर हे गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील कामे आटोपून घरी येत होते. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळ त्यांचा मुलगा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी आला होता. मिसर कल्याण रेल्वे स्थानकात उतरून गणेश मंदिर, सिध्दार्थ नगर भागातील स्कायवाॅकवरुन उतरत होते. त्यावेळी ४० वर्षाच्या एका इसमाने मिसर यांना थांबून मी खूप अडचणीत आहे. मला माझ्या घरी फोन करायचा आहे. तुमचा मोबाईल दया, अशी विनंती केली.
हेही वाचा… पथदिवे बंद असल्याने डोंबिवलीतील ठाकुर्ली पूल ते गणेशनगर रस्ता अंधारात
मिसर यांनी तात्काळ मोबाईल त्या तरुणाच्या ताब्यात दिला. तो तरूण बोलण्याचे निमित्त करून मोबाईल घेऊन मिसर यांच्या पासून दूर जाऊ लागला. मिसर यांनी पाठापोठ जाऊन त्याला रोखले आणि मोबाईल त्याच्याजवळून काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी भामट्याने मिसर यांचा मोबाईल स्वत:च्या खिशात टाकत मिसर यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जोराने हिसकावून पळ काढला. मिसर यांनी त्याचा पाठलाग केला, पण तो अंधाराच फायदा घेऊन पळून गेला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर पगारे तपास करत आहेत. अलीकडे कल्याण पूर्व, पश्चिम भागात रात्री ११ ते पहाटे चार वेळेत लुटमारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.