कल्याण – वाणीज्य शाखेचा पदवीधर असलेल्या कल्याणमधील एका रिक्षा चालकाची कोल्हापूर जिल्ह्यातील एका भामट्याने नोकरीच्या आमिषाने नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नोकरीसाठी गेल्या तीन वर्षांच्या काळात पैसे देऊनही नोकरी नाहीच, पण पैसेही परत मिळत नसल्याने रिक्षा चालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीची तक्रार केली.
अशोक नवनाथ पंडित (४२, रा. राठी पंचशील नगर, गाळेगाव, मोहन, कल्याण पश्चिम) असे फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. रमेश कलप्पा कंगराळकर (५३, रा. कोल्हापूर) असे भामट्याचे नाव आहे. एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, अशोक पंडितने बी. काॅम. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याला पत्नी आणि मुलगा आहे. तो सरकारी कार्यालयात नोकरीसाठी प्रयत्न करत होता. नोकरी नसल्याने तो आंबिवली भागात रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका करत आहे. आपणास नोकरीची गरज असल्याचे अशोकने मित्र पुष्पवर्धन रणदिवे (रा.मोहने) याला सांगितले होते. पुष्पवर्धनने त्याचा मित्र अजय राठी (रा. नाशिक) याची एअरपोर्ट ॲथाॅरिटीमध्ये ओळख आहे. तेथे काही जागांची नोकरभरती आहे. या कार्यालयात कोल्हापूरचा रमेश कंगराळकर यांची ओळख आहे. ते नोकरी लावण्याची कामे करून देतात, असे अशोकला सांगितले होते.
हेही वाचा – ठाणे पोलिसांकडून साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी
अशोकने रमेशला संपर्क करून प्रत्यक्ष भेट कल्याणमध्ये गुरुदेव हाॅटेलमध्ये घेतली. रमेशने अशोकला विमान साहाय्यक म्हणून तुला एअरपोर्ट ॲथाॅरिटीमध्ये लावतो, असे आश्वासन दिले. नोकरीसाठी आठ ते दहा लाख रुपये लागतील, असे रमेशने अशोकला सांगितले. कायम स्वरुपी नोकरी मिळणार असल्याने अशोकने दागिने, घर गहाण ठेवले. अशोककडून रमेशने नोकरी मिळण्यासाठी लागणारे अर्ज भरून घेतले. एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधीत रमेशने अशोककडून मध्यस्थांना पैसे वाटप करायचे आहेत अशी कारणे सांगून १० लाख १६ हजार रुपये वसूल केले. ही रक्कम अशोकने विजया बँक, बँक ऑफ इंडिया, आंध्र बँकेतून गुगल पे, निफ्टी माध्यमातून भरणा केली.
पूर्ण पैसे भरणा केल्यानंतर अशोकने नोकरीचे नियुक्ती पत्र कधी मिळेल अशी विचारणा सुरू केली. त्यास उशीर लागतो असे कारण रमेश देऊ लागला. त्यानंतर करोना महासाथ सुरू झाली. टाळेबंदीची कारणे रमेश सांगून वेळकाढूपणा करू लागला. पैसे देऊन अनेक महिने झाले तरी नोकरी मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या अशोकने रमेशकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. रमेशने एक लाख रुपये परत केले. उर्वरित पैसे वारंवार मागणी करूनही रमेश देण्यास तयार नव्हता. त्याने अशोकशी संपर्क तोडला. अशोकने अन्य मोबाईलवरून संपर्क साधला. त्याला रमेश टाळाटाळ करू लागला. आपणास नोकरी नाहीच, पण पैसेही परत मिळण्याची शक्यता नसल्याने आपली फसवणूक रमेशने केली आहे याची खात्री पटल्यावर गुरुवारी अशोकने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.